आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण व आंतकर्ण असे ३मुख्यभाग आहेत. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आंतकर्ण, यालाच इंग्रजीत कोक्लिया म्हटले जाते. याभागात मेंदूकडे आवाज पोहचवण्याचे महत्वाचे कार्य होते. ध्वनीचे सूक्ष्म विद्युत तरंगा मध्ये रूपांतर करून हा आवाज मेंदूपर्यंत पोहचवला जातो. त्यानंतर मेंदू अन्य अवयवांना सूचना करून कार्य घडवतो. ऐकणे व बोलणेयांचा जवळचा संबंध आहे. एखादा शब्द ऐकूच आला नाही तर बाळ त्याचा पुनरुच्चार तरी कसा करणार? त्यामुळे एखादे मुल बोलत नसेल तर त्याची प्रथम कानाची तपासणी करणे आवश्यक आहे.
ऑटो ऑकस्टीक इमिशन (OAE)म्हणजे कानाच्या आतील भागातून बाहेर पडणारा आवाज. आंतकर्ण व्यवस्थित काम करत नसेल तर या ध्वनीलहरी नष्ट होतात. त्यामुळे आंतकर्णाचे काम व्यवस्थित सुरु आहे कि नाही हे तपासणीसाठी OAEचा उपयोग होतो.
वैद्यकीयदृष्ट्या OAE अत्यंतमहत्वाचे आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाची OAEतपासणी करून घेतल्यास त्याच्यातील कर्णदोषांचे लवकर निदान करून त्याप्रमाणे उपचार करता येतात. ही एक साधी, सोपी, मुल झोपलेले असतानाही करता येणारी तपासणी आहे.
आपल्या रुग्णालयात कान, नाक, घसा विभागात अल्प शुल्कात ही तपासणी होते. कान, नाक, घसा विभाग व स्त्रीरोगशास्त्र व बालरोगशास्त्र विभागाने जानेवारी २०२० पासून बाल वयातील श्रवणदोष निदान व उपचार हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी प्रत्येक नवजात बालकाची श्रवणदोष (OAE) तपासणी केली जाते. या तपासणीत दोष आढळल्यास ३ महिन्यापर्यंतच्या वयात पुढील तपासण्या केल्या जातात. त्यानंतर आवश्यकतेनुसार ६ व्या महिन्यापर्यंत त्याच्यावर उपचार केले जातात.