पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा डी. वाय. पाटील हॉस्पिटल आदर्श नमुना कोविड काळातील सेवेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा विशेष सन्मान
“डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टीटयूटने कोविड-१९ महामारीच्या काळात केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय व स्पृहणीय आहे. संस्थेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपासून परीचारिकेपर्यंत सर्वांनी या सेवा कार्यात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. या महासंकटाच्या काळात हॉस्पीटलने सरकारी यंत्रणेला मदतीचा हात देत आपल्या कार्यातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा (पी.पी.पी.) आदर्श वैद्यकीय क्षेत्रासमोर ठेवला” असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई यांनी काढले. कोविड साथीच्या काळात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने समर्पित कोविड सेन्टरच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देत सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी केला आहे. या कार्याबद्दल जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई यांनी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील याचा विशेष सन्मान केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हॉस्पिटलने केलेल्या कार्याचा गौरव करणारे पत्र प्रदान करण्यात आले. “कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यामध्ये संस्थेच्या अव्वल व्यवस्थापन आणि प्रशासनापासून आरोग्यसेवेतील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनी दिलेले योगदान, संस्थेच्या संपूर्ण टीमचे सहकार्य आणि वचनबद्धता अनुकरणीय आहे. या सेवाकार्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “ असे देसाई यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीच्या काळात सीपीआर हॉस्पीटलमधील नॉन कोविड रुग्णाच्या सेवेचा भार डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने उचलला. त्यामुळे निरंतर अनुदानित आरोग्य सेवेचा लाभ जिल्हावासियांसाठी सुरु ठेवता आला. कोविड रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन स्वॅब तपासणी जलदगतीने व्हावी या उद्देशाने अत्यंत कमी वेळात एनएबीएल मोलेक्युलर बायोलोजीकल लॅब (जैविक प्रयोगशाळा) उभारण्याचे काम खूपच कौतुकास्पद आहे. या प्रयोगशाळेने अत्यंत जलदगतीने नमुने तपासणी केल्याने कोविड निदान लवकर होणे शक्य झाले, त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयावरील मोठा भारही कमी झाला. या महासंकटात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सीपीआर रुग्णालयाला दिलेला पाठिंबा व सहकार्य उल्लेखनीय असल्याचे देसाई यांनी पत्रात नमूद केले आहे. कोविड रूग्णांची संख्या वाढू लागताच हॉस्पिटलने स्वेच्छेने समर्पित कोविड रुग्णालयात रुपांतर करून 24 बाय 7 फ्लू ओपीडी, अलगीकरण कक्ष, कोव्हिड वॉर्ड्स, आयसीयू , गंभीर आजारासाठी जीवनरक्षक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. हॉस्पिटलमधून डीस्चार्ज मिळालेल्यांची संख्या व त्यांच्या व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य ही वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय समर्पणाची पोहोचपावतीच असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. कोविड महासंकटाच्या काळात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सार्वजनिक खाजगी भागीदारीचे (पी.पी.पी.) अनन्यसाधारण उदाहरण घालून दिल्याचे देसाई यांनी यावेळी नमूद केले. हॉस्पिटलच्या सर्व टीमला शुभेच्छा देताना समाजहितासाठी यापुढेही सहकार्य व सांघिक भावनेने कार्य करावे अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डीन डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहा. कुलसचिव अजित पाटील आदी उपस्थित होते.