अवघा २५ वर्षांचा मेहनती तरुण…रंग विक्रीच्या दुकानात काम करून अर्थार्जन करत होता….मात्र काम करणाऱ्या हातानेच असहकार पुकारला…उजव्या हाताच्या बोटावर उठलेल्या गाठीमुळे बोटाची व हाताची हालचाल मंदावली….तपासणीअंती कॅन्सरचे निदान झाले अन सारेच हादरले….डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून त्याचे हात आता पुन्हा कामात गुंतले आहेत. शाहुवाडी तालूक्यातील हा २५ वर्षीय तरुण एका रंगच्या दुकानात काम करत होता. वर्षभरापूर्वी या तरुणाच्या उजव्या हाताच्या चौथ्या बोटाला गाठ उत्पन्न झाली. अगदी लहान असलेल्या या गाठीकडे सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले. मात्र हळूहळू गाठ वाढू लागली. त्यामुळे बोटाची व त्या पाठोपाठ हाताची हालचाल मंदावू लागली. पुढे तर या हाताने कामच करणे अवघड बनले.
विविध ठिकाणी उपचार घेऊनही गाठ कमी होत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक त्याला घेऊन कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. येथील अस्थिरोग विभागाच्या डॉक्टरनी या बोटाचा एमआरआय काढला. यामध्ये बोटाची हालचाल करणाऱ्या मज्जारज्जूला कॅन्सरची गाठ झाल्याचे निदान झाले.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्या अस्थिरोग विभागाचे डॉ. प्रदीप पाटील, डॉ. उमेश जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णाच्या बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच या रुग्णाला फरक जाणवू लागला. आता त्यांच्या बोटांची व हाताची हालचाल पूर्ववत झाली असून त्याचे हात पुन्हा कामात गुंतू लागले आहेत, अशी माहिती अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल अस्थिरोग विभागाच्या टीमचे डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.